नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – करदात्यांना ॲडव्हान्स टॅक्सचा तिसरा टप्पाचा भरणा करण्याकरिता १५ डिसेंबर ही मुदत असून भविष्यात आयकर विभाकडून होणारी कारवाई अथवा करावर लागणारे व्याज यापासून निश्चिंत होण्याकरिता दिलेला मुदतीत ॲडव्हान्स टॅक्सचा भरणा करावा असे आवाहन अप्पर संयुक्त आयकर आयुक्त हर्षद सदाशिव आराधी यांनी केले आहे.
गडकरी चौक येथील आयकर कार्यालयात टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद यांच्यासोबत प्रधान आयुक्त शिवराज मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेल्या बैठकीत हर्षद आराधी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आयकर कायदा १९६१ नुसार करदात्यांनी ॲडव्हान्स टॅक्स वेळेत भरावा याकरिता आयकर विभागातर्फे वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. करदात्यांनी स्वतःहून पुढे येऊन त्यांचा ॲडव्हान्स टॅक्स दिलेल्या मुदतीत भरून कर दायित्वाची जबाबदारी पूर्ण करावी. ज्या करदात्यांचे करदायित्व दहा हजार रुपये पेक्षा जास्त आहे त्यांना ऍडव्हान्स टॅक्स भरणे गरजेचे असल्याने ॲडव्हान्स टॅक्स वेळेवर न भरल्यास करदात्यांना व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.
आयकर कायदा, 1961 च्या 234B आणि 234Cअंतर्गतव्याज आकारणे टाळण्यासाठी करदात्यांनी ॲडव्हान्स टॅक्सचा भरणा मुदतीत करावा.
याच बरोबर काही महत्वपूर्ण बाबी सूचित केल्या. करदात्यांनी कोणतेही महत्त्वाचे व्यवहार लपवू नयेत, सर्व उच्च मूल्याचे व्यवहार ऑनलाइन ट्रॅक केले जात आहेत. विभागाकडून नंतर आढळल्यास, यामुळे करदात्यांना त्रास होऊ शकतो ज्यामुळे दंड आणि कारवाई होऊ शकते.करदात्यांना आयकर प्रकरणासंबंधी त्यांचे मेल नियमितपणे तपासावे किंवा CPC द्वारे त्यांच्या ITR ची प्रक्रिया केल्यानंतरनिर्धारित केलेल्या कर दायित्व ताबडतोब अदा करावे. कर दायित्व चुकीचे असल्यास, करदात्यांनी ताबडतोब CPC कडे सुधारणा अर्ज दाखल करावा. CPC कडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास, करदात्यांनी दुरुस्तीसाठी न्यायिक मूल्यांकन अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.
आयकर विभागा मार्फत सरकारकडे ॲडव्हान्स टॅक्सचे संकलन होत असते त्यांतून राष्ट्रीय विकासाची उद्दिष्टे पूर्ण होत असतात जसे रस्ते, वैद्यकीय व शैक्षणिक विकास, सार्वजनिक सेवा सुविधा अशा प्रकारच्या धोरणांची अंमबजावणी करण्यासाठी होत असतो.*
ॲडव्हान्स टॅक्स करदात्यांने एकत्रित न भरता प्रत्येक तीमाहिती भरायचा असतो. त्याकरिता चार टप्पे निश्चित करण्यात आले आहेत, त्यात पहिला टप्पा १५ जून, दुसरा १५ सप्टेंबर, तिसरा १५ डिसेंबर शेवटचा हप्ता १५ मार्च पर्यंत भरावयाचा आहे. त्यातील तिसरा टप्पा १५ डिसेंबर च्या आत भरायचा आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी फारच कमी दिवस शिल्लक असल्याने व्यावसायिक व उद्योजकांनी त्यांच्या आर्थिक उलाढालीनुसार करदायित्व अदा करावे असे आवाहन राजेंद्र बकरे (माजी अध्यक्ष – टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन, नाशिक) यांनी केले.
करदात्यांनी आर्थिक वर्षात कमावलेल्या उत्पन्नावर वर्षाच्या शेवटी आयकर भरावा लागत असतो परंतु करदात्यांना एकाच वेळी मोठ्या कर रकमेचा बोजा पडू नये याकरिता आयकर विभागाने करदात्यांच्या सोयीसाठी ॲडव्हान्स टॅक्स भरणा ही तरतूद केली आहे. तरी सर्व करदात्यांनी वेळेत कर अदा करावा जेणेकरून भविष्यात त्याचा उपयोग राष्ट्रीय धोरण व सार्वजनिक विकासासाठीच होईल असे योगेश कातकाडे (कर सल्लागार) यांनी सांगितले.
यावेळी आयकर अधिकारी दत्ता दळवी, संजय सिंग, टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष संजय सोनवणे, राजेंद्र बकरे,योगेश कातकाडे,सुनील देशमुख, जयप्रकाश गिरासे, रंजन चव्हाण, नितीन फिरोदिया, प्रशांत उशीर, अनिकेत कुलकर्णी, प्रकाश विसपुते, निखिल देशमुख आदींसह नाशिक मधील करसल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते.