सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दोन दिवसांपूर्वी मुसळगाव परिसरात रतन इंडिया सेझच्या मोकळ्या जागेत सुरक्षारक्षकांना बिबट्या मुक्त संचार करत असताना दिसून आला होता. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. गुरुवारी रात्री आठ वाजेदरम्यान मुसळगाव येथे संतोष भगवान सिरसाठ यांच्या घरालगत गोठ्यात बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करत शेळीचा फडशा पाडला. याबाबत ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. वनविभागाने या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या वाढवावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
बिबटे यांचा नागरी वस्तीवर वावर वाढला असून अनेक पाळीव प्राण्यांवर तसेच नागरिकांवर बिबटे हल्ला करत असल्याच्या घटना समोर येत आहे. काही ठिकाणी नागरिकांवारही हल्ला केला आहे. सिन्नर तालुक्यात गेल्या आठवड्यात नायगाव खोरे सहावा बिबट्या पकडल्याने अजून किती बिबटे आहे. याचा अंदाज कोणालाही येत नसल्याने पूर्व भागाकडे नागरिक आता भयभीत झाली आहे.
गेल्या आठवड्यात खोपडी येथील चिमुकल्यावर बिबट्याने सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान हल्ला केल्याने चिमुकला जखमी झाला होता. ही घटना ताजी असतानाच फरदापुर येथे शेतकऱ्याची गरीब गाय म्हणून ओळखली जाणारी शेळी हल्ला केल्याची घटना घडली.