जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जामनेर तालुक्यात शेतीच्या वादातून मुलाने बापाला ठार केले. पहुर पोलिस स्टेशन हद्दीत शेंदुर्णी येथील तरंगवाडी येथे ही घटना घडली. नाना दामू बडगुजर (वय ८२), असे मयत पित्याचे तर कैलास बडगुजर (रा. वाडी दरवाजा, शेंदुर्णी), असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे.
नाना बडगुजर यांचे तरंगवाडी शिवारातील शेत आहे. मुलगा कैलास सोबत त्यांचा शेतीचा वाद कित्येक दिवसांपासून सुरु होता. घटनेच्या दिवशी शनिवारी सकाळी नाना बडगुजर व त्यांचा मुलगा कैलास बडगुजर हे दोघेही शेतात गेले होते. यावेळी पुन्हा एकदा दोघांमधे शेतीवरुन वाद झाला. यानंतर कैलासने संतापाच्या भरात वडील नाना बडगुजर यांच्या डोक्यात कुट्टी भरण्याचे लोखंडी फावडे टाकले. यामुळे नाना बडगुजर जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कैलास बडगुजर याचा मुलगा विशाल आणि त्याची पत्नी हे दुसऱ्या शेतात काम करत असतांना त्यांना घटनेची माहिती समजली. दोघेही
घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत कैलासने घटनास्थळावरुन पलायन केले. पळून गेलेल्या कैलासला शनिवारी रात्रीच पाचोरा येथून पहुर
पोलिसांच्या पथकाने अटक केली. दरम्यान, आजोबाचा खून केल्याप्रकरणी नातू विशाल कैलास बडगुजर याने दिलेल्या फिर्यादीनुसार पहुर पोलिस
स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.