मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा निर्यात बंदीच्या विरोधात शेतक-यांनी जोरदार आंदोलन सुरु केले असून दुसरीकडे कांदा व्यापा-यांनी लिलावात भाग न घेण्याचा निर्णय़ घेतल्यामुळे आता सरकार खडबडून जागे झाले. आता दिल्लीत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी या विषयावर उद्या बैठक बोलवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बैठकीला उपस्थित राहणार आहे. याबैठकी अगोदरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोयल यांची भेट घेतली आहे.
सोमवारीच चांदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे या प्रश्नावरुन रास्ता रोको करणार आहे. आतापर्यंत कांदा प्रश्नावर शरद पवारांनी कधीच आंदोलनात सहभाग घेतला नव्हता. पहिल्यांदा ते हे आंदोलन करणार असल्यामुळे या आंदोलनाची मोठी चर्चा आहे. त्यात हे आंदोलन लक्षवेधी ठरावे यासाठी राष्ट्रवादीसह शेतक-यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे सरकारही खडबडून जागे झाले आहे.
कांद्याच्या निर्यातबंदीवर सत्ताधारी पक्षाचे नेतेही केंद्र सरकारच्या या निर्णयावर नाराज आहेत. एकुणच कांद्याचा प्रश्न हा तीव्र झाला असून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटणार आहे. कांदा सरकारचे वांदे करेल अशी स्थिती सध्या दिसत आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर धावपळ सुरु झाली आहे. कांद्याच्या प्रश्नाबरोबरच इतरही पिकांचे प्रश्न असून त्यावरही आता सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.