इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने, मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, ४ डिसेंबर रोजी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरावरच्या कंटेनर मालवाहू स्टेशनमधील ४० फुटाचा एक कंटेनर जप्त केला. ५ डिसेंबर रोजी या कंटेनरची तपासणी केली असता या मालात सिगारेटच्या अघोषित (लपवलेल्या) कांड्या असल्याचे आढळले.
कागदपत्रात जो माल सांगण्यात आला होता, त्याच्या ऐवजी या कंटेनरमध्ये, गच्च भरलेल्या सिगारेट्स सापडल्या. या सिगारेट लपवून त्याचा चोरटा व्यापार करण्याची शक्यता होती, मात्र डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे हा गुन्हेगारी कट उधळला गेला.
धूम्रपान शरीराला हानिकारक असल्यामुळे, आणि पर्यायाने देशाच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांवर त्यामुळे येणाऱ्या भारामुळे, सरकार अशा हानिकारक वस्तूंवर उच्च दर्जाचा कर लावते. हा कर आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील आयातीशी संबंधित नियमने चुकवण्यासाठी, भ्रष्ट लोक अनेकदा, अशा वस्तूंची तस्करी किंवा काळा बाजार करतात. या छाप्यात, एकूण १४.६७ कोटी रुपये मूल्याच्या ८६,३०,००० सिगारेटस, सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदींअंतर्गत जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी अधिक तपास जारी आहे.