नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मध्ये सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १४ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या (इन्विटेशन लीग), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, नाशिकने उस्मानाबाद वर, ॲमबिशिअसने केडन्स वर व सांगलीने सीएनए वर मोठे विजय मिळवले.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी मिळालेल्या नाशिकने पहिल्या डावात १८७ धावा केल्या . त्या सातव्या क्रमांकावरील आर्यन घोडकेच्या ७३ , कर्णधार नील चंद्रात्रेच्या ३३ व चैतन्य चव्हाणच्या नाबाद २१ धावांमुळे. उत्तरदाखल उस्मानाबादने पहिल्या डावात १३६ धावा केल्या . नील चंद्रात्रेने ३ , मंथन पिंगळेने २ तर चैतन्य चव्हाण , देवांश गवळी व आर्यन घोडकेने प्रत्येकी १ गडी बाद गडी केला. दुसर्या डावात नाशिकने रुद्राक्ष मालवियच्या ६४ व नैतिक घाटेच्या ४१ धावांच्या जोरावर केवळ २६ षटकांत ५ बाद १४२ फटकावत वर डाव घोषित केला. विजयासाठी १९४ धावांचा पाठलाग करणाऱ्या उस्मानाबादला नील चंद्रात्रे व मंथन पिंगळे यांनी प्रत्येकी ३ तर देवांश गवळीने २ व आर्यन घोडकेने १ गडी बाद करत, १०३ धावांत गुंडाळून नाशिकला ९० धावांनी विजयी केले.
दुसऱ्या सामन्यात मेरी क्रिकेट मैदानावर ॲमबिशिअसच्या अर्जुन साळुंकेने सामन्यात ८ बळी घेत व साई गुंजाळने शतकी खेळी करत केडन्स वर ॲमबिशिअस ला १ डाव व ६७ धावांनी मोठा विजय मिळवून दिला. तिसऱ्या एस एस के क्रिकेट मैदानावरील सामन्यात सांगली ने सी एन ए वर १ डाव व ४० धावांनी मोठा विजय मिळवला . दीप जाधव च्या ११० धावा व ३ बळी आणि निहाल मुल्ला व ध्रुव कदम यांच्या अनुक्रमे सामन्यातील ६ व ५ बळींनी विजयात मोठा वाटा उचलला. महाराष्ट्रात नाशिक कोल्हापूर व पुणे येथे सदर राज्यस्तरीय साखळी स्पर्धा रंगत आहे.