मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील समुद्रात पुण्यातील एका खासगी अकादमीच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. समुद्रात आंघोळीसाठी पाच जण उतरले. पण, पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. यातील प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचे मृतदेह मिळाले. तर राम डिचोलकर बेपत्ता आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिकांनी मदतकार्य सुरु केले.
या घटनेनंतर मुख्यमंत्री यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे नमूद करून, याबाबत जिल्हा प्रशासनाला धोकादायक समुद्र किनारा परिसरात अधिक सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. समुद्र किनारी धोकादायक परिस्थिती असेल तर स्थानिकांकडून दिली जाणारी माहिती व प्रशासनाकडून दिला जाणारा इशारा याकडे पर्यटनासाठी गेलेल्यांनी दुर्लक्ष करू नये असे आवाहनही केले आहे. या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी सहवेदना प्रकट केली आहे.