नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नाशिक व नाशिक जिल्हा वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन नाशिक जिल्हयामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. डी. इंदलकर यांनी दिली.
१ कोटी २१ लाख रूपयांची तडजोड
एका मोटार अपघात प्रकरणात तब्बल १ कोटी २१ लाख रूपयांची तडजोड झाली. एक व्यक्ती लक्झरी बसने नाशिक ते अहमदाबाद येथे प्रवास करीत होते. तेव्हा एक ट्रक / बेलर चालक निष्काळजीपणाने गाडी चालवत असल्याने सदर लक्झरी बसला धडकला. त्यामुळे त्या व्यक्तीला जबर दुखापत झाली व त्याचे नंतर निधन झाले. सदर व्यक्तीच्या पश्चात आई, पत्नी व मुलगी असा परिवार होता. सदर लोकन्यायालयामध्ये यू.जे. मोरे, जिल्हा न्यायाधीश-११ यांच्या पॅनल मध्ये सदर मोटार अपघात प्रकरणप्रमुख न्यायाधीश एस. डी. जगमलानी, एन. व्ही. जिवने, जिल्हा न्यायाधिश-२ यांच्या मदतीने निकाली झाले. सदर प्रकरणामध्ये मयताच्या वारसांना रक्कम रूपये १,२१,००,०००/- इतकी रक्कम तडजोडीने देण्याचे मान्य केले. याकामी अर्जदारातर्फे अॅड, परवेज शेख, अॅड. आवेश खोत, सलीम शेख, वसीम शेख व फरहान शेख यांनी सहकार्य केले. बजाज इन्शुरन्स कंपनीतर्फे अॅड. संजय डबीर व कंपनीचे विमा अधिकारी अशोक महिर यांनी काम पाहिले.
२६५ प्रकरणे निकाली
त्याचप्रमाणे २६५ मोटार अपघात प्रकरणांमध्ये एकुण रक्कम रूपये १५,१३,२४,२४६/- नुकसान भरपाई मिळाली. मोटार अपघात प्रकरणांमध्ये एकुण ९८२ प्रकरणे ठेवण्यात आले होते. सदर प्रकरणांमध्ये २६५ प्रकरणे निकाली झाले. वेगवेगळ्ळया अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींनी स्वतः व मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांनी जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रकरणे दाखल केले होते. सदर प्रकरणे तडजोडीसाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आले होते. त्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना व मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तडजोड झाल्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई मिळण्याची व्यवस्था झाल्यामुळे दिलासा मिळाला. सर्व पक्षकारांनी तडजोड झाल्यामुळे समाधान व्यक्त केले.
नाशिकरोड येथील मोटार वाहन न्यायालय येथे एकून १४६५ मोटार वाहन प्रकरणांपैकी १४५ प्रकरणे निकाली झाली असून सदर वाहन चालकांना न्यायालयातील प्रकरणांपासुन दिलासा मिळाला आहे.
९५ कौटुंबिक वाद प्रकरणांमध्ये तडजोड
कौटुंबिक वादविवाद असलेल्या प्रकरणांमध्ये एकूण ९५ कौटुंबिक वाद प्रकरणांमध्ये तडजोड झाली. सदरच्या तडजोडीमुळे सर्व ९५ प्रकरणांतील संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. तसेच सर्व संसार फुलले अशा रितीने एकूण १९० कुटुंबांना संबंध पूर्ववत झाल्याने दिलासा मिळाला, त्यांचे वैवाहिक जिवन पूर्ववत झाले. मुलांना आई-वडील झाल्यामुळे आनंद झाला.
निकाली प्रकरणांचा तपशिल-
१) परकाम्य संलेख अधिनियम, कलम १३८ अंतर्गतची प्रकरणे – ६७०
२) मोटार अपघात – २६५
३) कामगार विषयक – ६
४) कौटुंबिक वादातील प्रकरणे – ९५
५) फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे – २६८
६) इतर – १०२२
एकुण – २३२६
४७ पॅनलची व्यवस्था
लोकअदालतमध्ये तडजोड करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालय व नाशिक जिल्हयातील तालुका न्यायालयात व नाशिक जिल्हयातील तालुका न्यायालयात एकुण ४७ पॅनलचे व्यवस्था करण्यात आलेली होती. सर्व पॅनल प्रमुख, सदस्य व न्यायालयीन कर्मचारी एस. डी. जगमलानी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली तडजोडीसाठी काम केले.
तडजोड प्रकरणात इतकी झाली वसुली
दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एकुण १,००,१७४ इतकी प्रकरणे ठेवलेली होती, त्यापैकी ८,६८७ प्रकरणे निकाली झाली असुन रक्कम रूपये १९,५५,३५.२१२/- इतकी वसुली झाली. अशा प्रकारे न्यायालयातील प्रलंबित व दावादाखल पूर्व प्रकरणे मिळून एकूण ११०१३ प्रकरणांचा निपटारा झाला आहे. सदर तडजोड झालेल्या सर्व प्रकरणांमध्ये रक्कम रूपये ८०,५३,६१,७८५/- इतकी वसुली झाली. सदर रकमेत तडजोड रक्कम समाविष्ट आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी द इंदलकर आणि जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. नितिन बाबुराव ठाकरे यांनी नाशिक जिल्हयातील सर्व न्यायीक अधिकारी, वकील, पक्षकार यांचे आभार मानले.