नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीतत चांदवड येथे सकाळी १० वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. कांद्याच्या प्रश्नावर पहिल्यांदाच शरद पवार हे रस्त्यावर उतरणार असल्यामुळे या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी चांदवड मुंबई आग्रा महामार्गावर एक तासा पेक्षा जास्त वेळ शेतक-यांनी रास्ता रोको केला. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला होता. त्यामुळे पवार यांनी चांदवडची निवड केली असून येथे आंदोलन करण्याचा निर्णय़ घेतला आहे. काल शेतक-यांनी जिल्हयात ठिकठिकाणी आंदोलन झाले. त्यानंतर नाशिक जिल्हा कांदा व्यापा-यांनी बेमुदत कांदा लिलाव बंद करण्याचा निर्णय़ घेतला. त्यामुळे कांद्याचा प्रश्न आता चिघळणार असल्याचे चित्र आहे.
हे आहे कारण
कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता. ३१ डिसेंबर पर्यंत एमइपी ८०० डॉलर प्रति टन ठेवण्यात आले होते. मात्र ८ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा वाणिज्य विभागाने नोटिफिकेशन काढून कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे.
असे घसरले भाव
केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीची अधिसूचना काढल्यामुळे शुक्रवारी सकाळी सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात १५०० ते २००० रुपयांची घसरण झाल्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार निषेध केला आहे