इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
हैदराबाद – तेलंगणामध्ये मुख्यमंत्रीनी शपथ घेतली आहे. आता सभागृहात निवडणून आलेले सर्व आमदार शपथ घेणार आहे. पण, भाजपच्या आमदारांनी शपथ घेण्यास नकार दिला. त्याला कारणही असेच आहे. असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांची तेलंगणाचे प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने विरोध करत शपथ घेण्यास नकार दिला आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक या प्रोटेम स्पीकरसोबत घेऊ नये, अशी मागणी तेलंगणा भाजपचे प्रमुख जी किशन रेड्डी यांनी केली.
हैदराबादमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना जी किशन रेड्डी म्हणाले, ‘आम्ही आठ जागा जिंकल्या आहेत आणि राज्यात १४ टक्के मतांची टक्केवारी गाठली आहे. प्रोटेम स्पीकर म्हणून वरिष्ठ नेत्याची नियुक्ती करण्याची परंपरा आहे; मात्र ‘एआयएमआयएम’सोबत झालेल्या करारामुळे काँग्रेसने अकबरुद्दीन ओवेसी यांची या पदावर नियुक्ती केली आहे. त्याला आमचा आक्षेप आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक या प्रोटेम स्पीकरसोबत घेऊ नये, अशी आमची मागणी आहे. आम्ही तेच राज्यपालांना सांगू. आमदार टी राजा सिंह यांनी ओवेसीसमोर आम्ही शपथ घेणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
भाजप खासदार हरनाथ सिंह यादव म्हणाले की, ओवेसींसारख्या लोकांचा डीएनए भारताचा नाही. त्याचा डीएनए पाकिस्तानचा आहे. टी राजा सिंह आणि भाजप आमदारांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. हा भाजपचा योग्य निर्णय आहे.