मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या पहिल्या उपोषणाच्या वेळी झालेले आंदोलन आणि पोलिसांच्या लाठीमार प्रकरणी दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्य़ास राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्यानंतर जरांगे पाटील संतप्त झाले आहेत. २४ तारखेपर्यंत गुन्हे मागे न घेतल्यास मराठा समाज काय आहे, हे दाखवून देऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.
गुन्हे मागॆ न घेण्याचे विधिमंडळात केलेले वक्तव्य फडणवीस यांना बदलावे लागदेल, असे त्यांनी म्हटले आहे. अधिवेशनादरम्यान फडणवीस यांना जालन्याचे आंदोलन आणि मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीस यांनी सरसकट गुन्हे मागे घेणार नसल्याचे लेखी उत्तर दिले होते. जरांगे पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जरांगे पाटील यांना सरकारने सरसकट गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सरकारला सरसकट गुन्हे मागे घ्यावेच लागतील, असे ते ठिकठिकाणी सांगत होते.
फडणवीस यांच्या लेखी उत्तराकडे जरांगे पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की गृहमंत्री कधी सर्व गुन्हे मागे घेतात ते बघूया. फडणवीस यांनीच माफी मागून सर्व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. फडणवीस यांनी तसे केले नाही, तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.