इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ड्रग्ज माफिया ललित पाटीलसह रोहित चौधरी, झिशान शेख, हरिशपंत या चौघांना शुक्रवारी मुबई पोलिसांकडून नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने या चौघा आरोपींना १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावणी आहे. ही पोलिस कोठडी १८ डिसेंबरपर्यंत असणार आहे. तर याप्रकरणातील शिवाजी शिंदे या आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
मुंबई, पुणे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आता नाशिक पोलिस या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ललित पाटील मुळ नाशिकचा रहिवासी असल्यामुळे अनेक जणांचे कनेक्शन चौकशीतून समोर येणार आहे. ललित पाटील प्रकरणात नाशिक पोलिसांनी जवळपास ५ कोटी ८४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे. यात ड्रग्ज कसे बनवले, ते कोठे विकले, त्यात कोण सामील आहे यासह वेगवेगळी चौकशी केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे शिंदे गावात उभारण्यात आलेल्या एमडी पावडर व कच्चा मालाच्या गोदामाबाबत त्याच्याकडे पोलिसांकडून चौकशी केली जाऊ शकते. याअगोदरही नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी आणले व काही कळायच्या आतच त्याला मुंबईला घेऊन गेले होते. पण, आता या आरोपींचा ताबा नाशिक पोलिसांना मिळाल्यानंतर ते संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे.
ही सुध्दा होणार चौकशी
साकीनाका पोलिसांनी पहिले ३०० कोटीचे ड्रग्ज पकडले होते. त्यानंतर याप्रकरणात अनेक कनेक्शन समोर आले. याप्रकरणात अनेक अधिका-यावर कारवाई करण्यात आली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून २ ऑक्टोंबरला फरार झाला होता. त्याने पळ काढल्यानंतर अनेक दिवस नाशिकमध्येच होता. त्याला कोणाचा राजकीय पाठींबा होता का? याचाही तपास केला जाणार आहे.