नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने रात्रीतून अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले. त्यामुळे काल शेतकरी रस्त्यावर उतरले. जिल्हयात ठिकठिकाणी आंदोलन झाल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजी नगर-नाशिक महामार्गावर विंचूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले.
नुकत्याच झालेल्या गरपीटीतून शेतकरी सावरत होते. त्यात कांद्याला चांगला दर मिळत होता. पण, अचानक केंद्र सरकारने निर्यात बंदी केली व कांद्याचे भाव कोसळले. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले. जर सरकारने निर्यातबंदी मागे घेतली नाही तर जिल्ह्यातून एकही कांदा बाहेर जाऊ दिला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला.
चांदवड येथे काल रास्ता रोका झाला. याठिकाणी पोलिसांनी शेतक-यांवर सौम्य लाठीचार्जही केला. त्यामुळेही शेतक-यांमध्ये संताप आहे. कांदा निर्यात बंदीमुळे जिल्ह्यात सर्वच बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद असतांना विंचुर येथे मात्र लिलाव सुरु आहे. त्याचठिकाणी आज स्वाभिमानी आक्रमक झाली आहे.