इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हिंदी पट्ट्यातील मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळाला आहे. यानंतर येथील मुख्यमंत्र्यांबाबत पक्षाने सस्पेन्स कायम ठेवला आहे. तीनही राज्यात भाजपचे दिग्गज चेहरे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. अंतिम निर्णय घेण्यासाठी पक्षाने निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पण, येथील माजी मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन चेह-याला संधी देणे इतके सोपे नाही. त्यामुळे भाजपला येथे निर्णय घ्यायला उशीर होत आहे. दुसरीकडे या विलंबावर विरोधकांनी मात्र निशाणा साधला आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना राजस्थानचे निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मध्य प्रदेशसाठी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोन नेत्यांसोबतच पक्षाने अन्य वरिष्ठ नेत्यांकडे निरीक्षकांची जबाबदारी दिली आहे. छत्तीसगडसाठी पक्षाने केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि पक्षाचे सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. हे निरीक्षक त्या त्या राज्यातील मुख्यमंत्री कोण आहे, हे ठरवतील. सध्या राजस्थानमध्ये वसुंधराराजे शिंदे, किरोरीलाल मीना, बाबा बालकनाथ, गजेंद्रसिंह शेखावत आणि दियाकुमारी यांची नावे स्पर्धेत आहेत. यापैकी एका नावावर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अभिप्राय घेऊन मुख्यमंत्री निवड केली जाणार आहे. पण, माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे या अजूनही दिल्लीत ठाण मांडून आहे. अगोदर त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतली. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशीरा त्या गृहमंत्री यांना भेटल्या. त्या इतक्या सहजासहजी दावा सोडण्यास तयार नाही. पण, तरी सुध्दा त्यांना संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
राजस्थानमध्ये रविवारी विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते, असे मानले जात आहे. नवीन सरकार, नवीन मुख्यमंत्री आणि नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी १६ तारखेपूर्वी होऊ शकतो. ज्योतिरादित्य शिंदे हे मध्य प्रदेशात शर्यतीत आहेत. मध्य प्रदेशाचा सस्पेन्सही सोमवारी संपणार आहे. निरीक्षक म्हणून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. लक्ष्मण आणि पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आशा लाक्रा आज किंवा उद्या भोपाळला पोहोचू शकतात. तिथे शिंदे यांच्यासह विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हाद पटेल, व्हीडी शर्मा यांचीही नावे शर्यतीत आहेत. शिंदे हे मोदी यांच्यासाठी खूप खास आहेत आणि त्यांच्याकडे निवडणुकीची मोठी जबाबदारी होती. त्यामुळे त्यांना येथे संधी मिळू शकते. पण, माजी मुख्यमंत्री शिवारजसिंह चौहान आपला दावा सोडण्यास तयार नाही. ते थेट बोलत नसले तरी ते भावनिक वातावरण तयार करत आहे. त्यामुळे भाजपपुढे येथेही पेचच आहे.
छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्र्यांबाबत सस्पेन्स कायम आहे. माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याशिवाय रेणुका सिंह, अरुण साव, विष्णू देव साई आणि ओपी चौधरी यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आहेत. रविवारी इथला सस्पेन्स संपुष्टात येऊ शकतो. केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि पक्षाचे सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम हे निरीक्षक आहे. येथेही तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेले रमण सिंह हे पडद्यामागून हालचाली करत आहे. पण, त्यांना संधी मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. एकुणच तीन्ही राज्यात माजी मुख्यमंत्र्यांचा पेच सोडवणे भाजपला इतके सोपे नाही. या ठिकाणी मुख्यमंत्री निवडतांना आगामी लोकसभेचे गणितही पक्षाला लक्षात ठेवावे लागणार आहे. त्यात कोणालाही नाराज करुन निवड करणे हे सुध्दा भाजपला महागाता पडणार आहे. त्यामुळे भाजपने निवडीसाठी बराच वेळ घेतला आहे. तो अजूनही वाढण्याची शक्यता आहे. वरवर सर्व अलबेल वाटत असले तरी आतून मात्र छुपे डाव टाकणे सुरु आहे. ते मात्र समोर येत नाही.