नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -‘द प्रेसिडेंट विथ पीपल’ या कार्यक्रमांतर्गत क्रीडापटूंच्या एका गटाने शुक्रवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. खेळाडूंशी आपुलकीची भावना प्रस्थापित करण्याबरोबरच त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेणे हा या बैठकीचा उद्देश होता.
खेळाडूंशी संवाद साधताना राष्ट्रपती म्हणाल्या की, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अद्वितीय कामगिरीद्वारे देशाचा गौरव केला आहे. त्यांचे समर्पण, उत्कटता आणि उत्कृष्टतेची अटल बांधिलकी यांनी केवळ वैयक्तिक नैपुण्य सिद्ध केले नाही तर सामुहिक रूपाने क्रीडा जगतात भारताचे नाव उंचावले आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांच्या विलक्षण प्रयत्नांमुळे अनुक्रमे १०७ आणि १११ पदकांची कमाई झाली.
ही उल्लेखनीय कामगिरी त्यांची प्रतिभा दाखवण्याबरोबरच उत्तम कामगिरी करण्याच्या त्यांच्या मनोवृत्तीचे उदाहरण देखील असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांचा प्रवास केवळ वैयक्तिक विजयांचा नाही; तर सर्व भारतीयांच्या स्वप्नांना पंख देणारा आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले. आपण केवळ क्रीडापटू नाही, तर आपल्या संस्कृतीचे, मूल्यांचे आणि अब्जावधी लोकांच्या भावनांचे राजदूत आहेत हे नेहमी लक्षात ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
त्या म्हणाल्या की काही महिन्यांत जगाचे लक्ष पॅरिस ऑलिम्पिक आणि २०२४ च्या पॅरालिम्पिककडे वळेल आणि सर्व भारतीयांच्या नजरा आपल्या खेळाडूंवर खिळलेल्या असतील. आपल्या देशाला आनंद आणि गौरव मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांचे कौशल्य, समर्पण आणि खिलाडूवृत्ती यावर विश्वास ठेवतो.