नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी सर्व सोयीसुविधांसह रस्ते सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली.
यावेळी त्यांनी परिवहन विभागाने समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी काय केले याची माहिती दिली. ते म्हणाले की ६६८२२ टायर तपासणी, रिफ्लेक्ट नसलेली ९४८ वाहन, ब्रेथ ॲनालाइजर २१२६५, लेन कटिंग ४९३१, ओव्हर स्पीड ६१२, नो पार्किंग ५८९८, दोषी वाहने, १०५८१, एकूण दंड वसूल २७ लाख २५ हजार ४५५ करण्यात आला आहे. तसेच समृद्धी महामार्ग १ डिसेंबर २०२३ पर्यंत जवळपास ४ हजार ५०० वाहनचालकाचे समुपदेशन करण्यात आले आहे. राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, अतिवेगाने वाहन चालविणे, ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. रस्त्यावरील व महामार्गावरील अपघांतावर नियंत्रण आणण्यासाठी परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांमार्फत नियमितपणे तसेच विशेष तपासणी मोहिमेद्वारे कारवाई करण्यात येत असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.
समृध्दी महामार्गावर १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ घडलेल्या अपघाताबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीवर उत्तर देतांना मंत्री भुसे बोलत होते.
मंत्री श्री.भुसे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील १६ ठिकाणांवर सर्व सोयीसुविधांसह पेट्रोल, डिझेल पंप, स्वच्छता गृह, पिण्याचे पाणी, चहा- नाश्ता अशा विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबतची निविदा काढण्यात आलेली आहे. हे काम चार महिन्यांत पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. समृध्दी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहतुकीस शिस्त लावणे व अपघातांची संख्या कमी करणे याकरिता उपाययोजना करण्यात येत आहेत. वेग मर्यादा फलक, चिन्ह फलक, सूचना फलक अशा उपाययोजना फलक लावण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरियर्स बसविण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून 20 टक्के काम प्रगतिपथावर आहे. रस्त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने माहितीपत्रके, फलक लावण्यात आलेले आहेत.
हा महामार्ग ज्या ८ जिल्ह्यांमधून जातो त्या जिल्ह्यांमध्ये परिवहन विभागाचे प्रत्येकी १ तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ८ वाहने उपलब्ध देण्यात आली आहेत. या पथकांमार्फत समृध्दी महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावणे, रस्ता सुरक्षा विषयक जागृती करणे, वाहनचालकाचे समुपदेशन करणे इत्यादी रस्ता सुरक्षा विषयक कार्य करण्यात येतात. या उपाययोजना महामार्गावर अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या असल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले.
वन्य प्राण्यांसाठी ज्या भागात वन्य प्राण्यांची संख्या जास्त आहे. त्या-त्या ठिकाणी पुलाची निर्मिती केली आहे. वन्य प्राण्यांचे अपघात रोखण्यासाठी रस्त्याच्या कडेला बॅरिकेट लावण्यात आले आहे.या लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे,सदस्य अनिल परब,अनिकेत तटकरे,राजेश राठोडयांनी सहभाग घेतला होता.