इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते, त्यातच देवरिया जिल्ह्यात सोमवार २ ऑक्टोबर रोजी भयानक घटना घडली आहे. जिल्ह्यातील रुद्रपूर कोतवाली नजिकच्या फतेहपूर गावात जुन्या वैमनस्यातून सहा जणांची हत्या करण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी मोठे पोलीस पथक दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असून या प्रकरणामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेत हल्लेखोरांनी अवघ्या २५ मिनिटांत केली संपूर्ण कुटुंबाची हत्या केल्याचे समोर आले आहे. आधी जमिनीच्या वादातून एकाचा खून झाला आणि त्यानंतर आणखी पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या संपूर्ण घटनेचे मूळ १० बिघे जमीन असून त्यासाठी हा रक्तरंजित संघर्ष झाल्याचे सांगण्यात येत आहे. सत्य प्रकाश दुबे यांचा भाऊ साधू दुबे यांनी त्यांची जमीन माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेम यादव यांना विकली. यादव हे जमिनीवरील पिकाची कापणी करण्यास गेले, तेव्हा सत्य प्रकाश यांनी विरोध केला. त्यातून झालेल्या वादात यादव समर्थकांनी सत्यप्रकाश यांच्या घरात घुसून हत्याकांड केले. सोमवारी सकाळी फतेहपूर गावातील लेधा टोला येथील सत्यप्रकाश दुबे यांच्या घरावर संतप्त कुटुंबीयांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी अवघ्या २५ मिनिटांत संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. तसेच गुन्हा केल्यानंतर सर्व हल्लेखोर गावातून पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. गावात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून पीडितेच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना देतानाच मुख्यमंत्र्यांनी पीडितेच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचेही सांगितले आहे. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.