इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
समृध्दी महामार्गावर १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोलनाक्याजवळ घडलेल्या अपघाताबाबत विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीवर उत्तर देतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी माहिती दिली.
या अपघातातील १३ मृत प्रवासीयांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक विशेष बाब म्हणून प्रत्येकी रुपये पाच लाख याप्रमाणे एकूण रुपये ६५,००,०००/-(रुपये ६५ लाख फक्त) इतके अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. १५ ऑक्टोंबरला ट्रॅव्हल्स बस व ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला होता. ही ट्रव्हल्स बस नाशिकची होती. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गाचे दर्शन करून ती पुन्हा नाशिककडे परत येत होती. त्यावेळेस हा अपघात झाला होता. या ट्रव्हल्स बसने ट्रकला मागून धडक दिल्याने अपघात झाला होता. त्यावर ही लक्षवेधी मांडल्यानंतर भुसे यांनी धक्कादायक माहिती सभागृहाला दिली.
दोन सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक सेवेतून निलंबित
संभाजीनगर येथून शिर्डीच्या दिशेने जात असतांना झालेल्या या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणारे १३ प्रवासी मृत्यूमुखी पडले व २२ प्रवासी जखमी झालेले आहेत. या प्रकरणी परिवहन आयुक्त कार्यालयाच्या स्तरावर चौकशी करण्यात आली असून या प्रकरणी परिवहन आयुक्त कार्यालयाच्या १५ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या आदेशानुसार ०२ सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
या त्रुटी या अपघातास कारणीभूत
अपघातग्रस्त वाहनाची तांत्रिक तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाने केली आहे. वाहनाची नोंदणीकृत आसन क्षमता १७+१ अशी असताना या वाहनांमधून बेकायदेशीर रित्या ३४ प्रवासी प्रवास करत होते. या वाहनास वेग नियंत्रक बसविलेले नव्हते. तसेच वाहनाच्या आसन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेला आहे, वाहन चालकास प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना नसताना देखील वाहन चालवण्यात येत होते. वाहनाचा कर वैध नसताना वाहन रस्त्यावर आणले इत्यादी त्रुटी या अपघातास कारणीभूत असल्याचे मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.