नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मुंबईसह राज्यातील शहरांतील इमारतीच्या अग्निप्रतिबंधक यंत्रांच्या सुस्थितीची पाहणी करण्यासाठी भरारी पथक तयार करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
विधानपरिषदेत महाराष्ट्र अग्नि प्रतिबंधक जीव संरक्षण उपाययोजना अधिनियमानुसार, इमारतींचे मालक भोगवटादार गृहनिर्माण संस्थांनी इमारतीचे फायर ऑडिट परवाना अग्निशामक यंत्रणेमार्फत करून घेण्यासंदर्भात सदस्य प्रसाद लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.
मुंबई अग्निशमन दलामार्फत उत्तुंग इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वी या इमारतीस सशर्त देण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रातील अग्निसुरक्षाविषयक बाबींची पूर्तता केल्याबाबत अग्निसुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाते. त्यानुसार त्याबाबतचा अहवाल ऑनलाईन पध्दतीमध्ये जतन करुन त्याबाबतचे अभिप्राय संबंधितांना पाठविले जात असल्याचे मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.
आगीच्या दुर्घटना रोखण्यासाठी मुंबई अग्निशमन दलामार्फत एकूण ६ हजार ९७५ अग्निस्वयंसेवकांना तसेच २ हजार ५० अग्निरक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘आहार’ या संघटनेकरिता उपहारगृहातील ३८१ कर्मचाऱ्यांना प्राथमिक अग्निसुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयातील व ५ मुख्य रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना अग्निसुरक्षेबाबत प्रशिक्षण व प्रात्याक्षिके दाखविण्यात आलेली आहेत. मुंबईतील ६९ मॉल्सची तपासणी करण्यात आलेली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
मुंबईतील जनतेच्या जनजागृतीकरिता दिनांक १४ एप्रिल ते २० एप्रिल असा अग्निसुरक्षा सप्ताह तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत वेगवेगळे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम राबविण्यात आला आहेत. मुंबईतील विविध शाळेतील विद्यार्थ्यांना अग्निशमन केंद्राच्या भेटीदरम्यान अग्निसुरक्षेबाबतची माहिती दिली जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सदस्य सचिन अहीर, जयंत पाटील, प्रवीण दरेकर, अनिल परब यांनी चर्चेत सहभाग घेतला.