इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असतांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज मोठे आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाढती महागाई व बेरोजगारीच्या मुद्दयावरुन या आंदोलनात विधानसभेला घेराव घालण्यासाठी आज हजारोच्या संख्येने युवक आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक पदाधिका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी पटोले यांनी सांगितले की, तानाशाही सरकार विरोधात हे आंदोलन असून विविध मागण्यांसाठी हजारो युवक या आंदोलनात सहभागी झाले आहे. आपल्या सत्तेचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आज करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्यातील बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे. उद्योगधंदे परराज्यात निघून जात आहेत. तरुणांचे हाल होत आहेत. सरकारी पदांपेक्षा कंत्राटी नोकऱ्यांवर भाजपचा भर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या विधानसभा घेराव आंदोलनामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, सुनील केदार, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी व्ही व महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कुणाल राउत आणि हजारो युवक उपस्थित होते.