इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – विमानात मद्य सर्व्ह केले जाते, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. विमानतळावर देखील बार असतो आणि लोक दारू पिऊन प्रवास करतात, हेही माहिती आहे. पण विचार करा की, पायलटचीच अल्कोहोल टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर काय होईल. अर्थात कोणताही पायलट दारू पिऊन कामावर येणार नाही. पण तरीही त्याची टेस्ट पॉझिटिव्ह येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मुळात आपण घेतो ती सगळी औषधे, माऊथ वॉश, परफ्युम यात अल्कोहोलचे प्रमाण असते. कामावर जाताना बऱ्याच लोकांना परफ्युम, बॉडी स्प्रे मारण्याची सवय असते. मात्र वैमानिकांनी परफ्युम मारला असेल किंवा माऊथ वॉश घेतले असेल तर त्यांच्या ब्रेथ एनालायझर टेस्टमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळू शकते. त्यामुळे त्यांना उड्डाणास प्रतिबंध घातला जाऊ शकतो. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी सिव्हिल एव्हिएशनच्या नियमांत बदल करण्यासंदर्भात पावले उचलली जात आहे.
त्यादृष्टीने वैमानिक, विमान कंपन्या आणि विमान उद्योगाशी संबंधित घटकांकडून हरकती मागवल्या जात आहेत. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नियमांमध्ये परफ्युम, माऊथ वॉश, बॉडी स्प्रे, विविध औषधे यांच्या वापरावर भविष्यात बंदी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांना विशिष्ट प्रकारचे आजार आहेत. ज्यांना विविध प्रकारची औषधे घ्यावी लागतात. त्यांनी आपल्या डॉक्टरांना आपल्या कामाची कल्पना द्यावी, जेणेकरून डॉक्टरही औषधे देताना काळजी घेतील. यासंदर्भातील अनौपचारिक सूचना विमान कंपन्यांनी दिल्या आहेत.
अल्कोहोलची मात्रा
परफ्युम, माऊथ वॉश, विविध औषधांमध्ये अल्कोहोलची मात्रा असते. त्यामुळे मद्यप्राशन केले नसले तरीही वैमानिकांच्या ब्रेथ एनालायझर टेस्टमध्ये अल्कोहोलचे प्रमाण सकारात्मक दिसू शकते. या पार्श्वभूमीवरच नियमांमध्ये बदल करण्याची तयारी सुरू झाली आहे.