चांदवड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारने पुन्हा घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. त्यामुळे शनिवारपासून पासून जिल्ह्यातील सर्व कांदा लिलाव बेमुद बंद राहणार आहे. चांदवड येथे झालेल्या कांदा व्यापारी असोशियशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
आज केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहे. सकाळपासून लासलगावसह जिल्ह्यातील विविध भागात कांदा लिलाव ठप्प झाले आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले, चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर एक तासा पेक्षा जास्त वेळ रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज केला.
हे आहे कारण
कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता. ३१ डिसेंबर पर्यंत एमइपी ८०० डॉलर प्रति टन ठेवण्यात आले होते. मात्र ८ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा वाणिज्य विभागाने नोटिफिकेशन काढून कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे.
आज भाव घसरले
केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीची अधिसूचना काढल्यामुळे आज सकाळी सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात १५०० ते २००० रुपयांची घसरण झाल्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार निषेध केला आहे