नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्याचे नवे हवाई वाहतूक धोरण लवकरच प्रत्यक्षात येणार असून त्यात हवाई वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या तरतुदींचा अंतर्भाव असणार आहे. राज्याच्या हवाई वाहतुकीसाठी ही एक नवी सुरुवात असेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
भारतातील हेलिकॉप्टरच्या देखभाल, दुरुस्ती व तपासणीसाठी (एमआरओ) एअरबस हेलिकॉप्टर्स आणि इंडामेर यांच्यात झालेल्या करारानुसार मिहान येथील एमआरओ केंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, यावेळी फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारचा हवाई वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असून अनेक योजना अंमलात येत आहेत. देशातील देखभाल, दुरुस्ती व तपासणी सुविधा केंद्राचा (एमआरओ) वस्तू व सेवा कर हा १८ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या धोरणामुळे हवाई क्षेत्राशी निगडीत अनेक कंपन्या एमआरओ केंद्र सुरू करण्यासाठी पुढे येत आहे. देशात नवीन २७ केंद्रे सुरू झाली असून यापैकी अनेक सुविधा केंद्रे महाराष्ट्रात आहेत. नागपुरातील आंतरराष्ट्रीय कार्गो हबसाठी अनुकूल हवाई वाहतूक धोरण प्रत्यक्षात साकारण्यास हे केंद्र सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास उपमुख्यमत्र्यांनी व्यक्त केला.
जगात हेलिकॉप्टरचा वापर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधा, पर्यटन, कायदा व सुव्यवस्था या बाबींसाठी होत आहे. राज्याच्या नवीन वाहतूक धोरणात एमआरओ, विमानतळांच्या धर्तीवर हेलिपॅडची निर्मिती या बाबींचा अंतर्भाव राहील. देशात हवाई वाहतूक क्षेत्राची लक्षणीय वाढ होत असून याचा राज्याला लाभ होण्याची गरज यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केली.
खासदार प्रफुल्ल पटेल, एअरबस हेलिकॉप्टरच्या ग्राहक सहाय्य सेवा विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष रोमेन ट्रॅप, इंडामेर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रजय पटेल, एअरबस भारत व दक्षिण आशियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रेमी मेलार्ड आणि एअरबस भारत व दक्षिण आशियाच्या हेलिकॉप्टर विभागाचे प्रमुख सनी गुगलानी आदी यावेळी उपस्थित होते.