इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोपातून पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी आज रद्द करण्यात आली. त्यांच्यावर हे आरोप झाल्यानंतर या प्रकरणी चौकशी समितीही नेमली होती. या समितीने अहवाल दिल्यानंतर यावर कारवाई करण्यात आली.या प्रकरणावर आज संसदेत चर्चा झाली त्यावेळी विरोधकांनी जोरदार विरोध केला.
या कारवाईनंतर महुआ मोइत्रा यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की जर या मोदी सरकारला असे वाटले असेल की माझ्यावर कारवाई करून ते अदानी प्रकरण दूर करू शकतील. तर तसे होणार नाही. आज तुम्ही अदानी तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले. या प्रकरणात घाई व प्रक्रियेचा गैरवापर करण्यात आला. तुम्ही एका महिला खासदाराचा छळ केल्याचाही आरोप त्यांनी केला.
हा आहे आरोप
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी एका उद्योगपतींकडून पैसे आणि भेटवस्तू घेतल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात हिरानंदानी यांनी मोईत्रा यांना रोख रक्कम आणि भेटवस्तू दिल्या होत्या. २०१९ ची निवडणूक लढण्यासाठी मोईत्रा यांना त्यांनी ७५ लाख रुपये दिले होते. मोईत्रा यांना महागडे आयफोनही दिले होते. मोईत्रा यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्याची डागडुजीदेखील हिरानंदानी यांनीच केली होती, असे आरोप दुबे यांनी केले होते.