नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मध्य नाशिक मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने ११५ कोटीं रुपयांच्या कामांना पुरवणी अर्थसंकल्पात मंजुरी मिळविण्यास आमदार प्रा. सौ. देवयानी सुहास फरांदे यांना यश आले आहे. यात प्रामुख्याने धनगर समाजाचे वस्तीगृह, नवीन वनभवन, भूमी अभिलेखे विभागाचे नवीन कार्यालय बांधणी, संदर्भ सेवा रुग्णालयातील प्रलंबित बांधकामे, महिला रुग्णालयासाठीचा निधी या कामांचा समावेश आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यातील विकासाच्या कामांना वेग दिला आहे. या सरकारच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमदार देवयानी फरांदे यांनी मध्य नाशिक मतदार संघासाठी विविध कामे सुचविली होती. त्यात ११५ कोटी रुपयांच्या कामांना पुरवणी अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. यात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाचे नवीन वस्तीगृह बांधण्यासाठी ४३.५२ कोटी रुपये मंजुर झाले आहेत. शहरात शिक्षणासाठी आलेल्या धनगर समजाच्या विद्यार्थ्यांचा या वसतीगृहाच्या माध्यमातून मोठा प्रश्न सुटणार आहे.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील वनविभागाची कार्यालयाची अवस्था बिकट आहे. कार्यालयाचा व्याप बघता हे कार्यालय अपूरे पडते. त्यामुळे जुने कार्यालय पाडून त्या ठिकाणी नवीन वनभवन बनण्यासाठी २५ कोटी रुपयांस मंजुरी मिळाली आहे. तसेच सीबीएस येथे भूमी अभिलेख विभागाचे नवीन कार्यालय बांधण्यासाठी १४.९९ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहे. संदर्भ सेवा रुग्णालय बांधण्यासाठी २० कोटींचा अतिरिक्त निधी मिळणार आहे. भाभा नगर येथील महिला रुग्णालयासाठी यापूर्वी मंजूर असणार्या कामाला ४ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीही मंजुर झाला आहे. त्यामुळे नाशिकमधील महत्वाचे प्रश्न या निमित्ताने सुटणार आहे. या सर्व कामांची लवकरच टेंडर प्रक्रिया करण्यात येणार असून लवकरच कामांना सुरुवात करण्यात येईल, असे आ. प्रा. सौ. देवयानी सुहास फरांदे यांनी सांगितले. नाशिकच्या विकासात महत्वाची भर घालणार्या या कामांना मंजुरी देणार्या महायुती सरकारमधील सर्व मंत्रीगणांचे आमदार फरांदे यांनी आभार मानले आहेत.