नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –शुल्क भरल्याशिवाय अनेकदा अत्यवस्थ स्थितीतील रूग्णास दाखल न करवून घेण्याचा अथवा दु:खद घटनांमध्ये मयत रूग्णांचे शरीरही नातलगांना परत करण्याअगोदर शुल्काचा चोख हिशेब घेण्याचा कटू अनुभव अनेकदा रूग्णांमध्ये चर्चेत असतो. मात्र, एखाद्या अटीतटीच्या समयाला गंभीर स्वरूपात दाखल झालेल्या रूग्णाचे शुल्क तर दूरच पण त्याची ओळखही निश्चीतपणे पटण्याअगोदर श्रीगुरूजी रूग्णालयातील ह्रदयविकार विभाग व विभाग प्रमुख डॉ. मनोहर शिंदे यांनी अत्यवस्थ रूग्णाचे बंद पडलेले ह्रदय उपचारांद्वारे सुरू करून सायकलिस्ट रूग्णास जीवदान दिले आहे.
गंगापूर रोडवरील बापू पुलानजीक एका ज्येष्ठ नागरीकांना काही दिवसांपूर्वी चक्कर आल्यासारखे वाटल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना नजीकच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान संचलित श्रीगुरूजी रूग्णालयात दाखल केले. आवश्यक त्या तातडीच्या तपासण्यांनंतर रूग्णास ह्रदयविकार निष्पन्न झाला. ह्रदयरोग विभाग प्रमुख डॉ. मनोहर शिंदे व स्टाफ तातडीने रूग्णालयात पोहोचला तेव्हा रूग्णाचे नातलगही सोबत नव्हते. रूग्णाच्या नातलगांची वाट बघण्यात वेळ घातल्यास हातून वेळ निसटेल हे लक्षात घेऊन शिंदे यांनी तातडीने रूग्णाची अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. एव्हाना रूग्णाचा रक्तदाब ५० वर आणि ह्रदयाचे ठोके ३० पर्यंत आल्याने प्रत्यक्ष रूग्णाचा काळ समोर उभा होता. मात्र, कागदपत्रांचे पूर्तता, आवश्यक शुल्क, सह्या आदी कुठल्याही औपचारिकतेत न अडकता डॉ. शिंदे यांनी रूग्णास कॅथलॅबमध्ये दाखल केले.
अँजिओग्राफीची सुरुवात डॉक्टर करीत असतानाच हृदयाला रक्त पुरवठा करणारी एक महत्वाची रक्तवाहिनी १०० टक्के ब्लॉक होते. परिणामी, रुग्णाचे हृदय जवळ जवळ पूर्णच बंद झाल्यात जमा झाले. हा अटीतटीचा प्रसंग लक्षात घेऊन रुग्णाचे हृदय सुरू करण्यासाठी जोरकस प्रयत्न सुरू झाले. या रूग्णासाठी सीपीआर आणि डी.सी. शॉक देण्यात आल्याने काही मिनीटात रूग्णाचे ह्रदय सुरू झाले. या गुंतागुंतीमुळे आवश्यक ठिकाणी योग्य पद्धतीने स्टेंट टाकण्यास डॉ.मनोहर शिंदे यांना अतिशय कमी वेळ मिळाला . अवघ्या तीन मिनिटात डॉक्टरांनी बंद पडलेल्या रक्तवाहिनीत स्टेंट टाकला अन् रुग्णाच्या हृदयाचा रक्त पुरवठा सुरळीत सुरू झाला. तेव्हा सर्वांचा जीव भांड्यात पडला.
सायलीस्ट फाऊंडेशन रूग्णालयात_
या घटनेत ज्या रूग्णावर तातडीने उपचार करण्यात आले त्याच्यावर उपचारांसाठी जरादेखील वेळ गेला असता अथवा नातलग, कागदपत्रे पूर्तता अन् शुल्कासाठी अडवणूक झाली असती तर चित्र वेगळे असते, या जाणीवेतून रूग्णासोबत असणाऱ्या नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे संस्थापक आयपीएस हरीश बैजल यांच्या नेतृत्वाखाली एन.सी एफचे अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष अरुण पवार, डॉ. मनिषा रौंदळ, माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, संचालक दीपक भोसले यांनी श्रीगुरुजी रुग्णालयाचे हृदयविकार तज्ञ डॉ मनोहर शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा छोटेखानी सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. डॉ मनोहर शिंदे यांनी सर्व टीमचे आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. आणि त्यावेळेस केवळ रुग्णाला आपल्या एकत्रित प्रयत्नांनी जीवदान द्यायचे या एकाच ध्येयाने सर्व टीमने काम केले असे प्रतिपादन केले. याप्रसंगी श्रीगुरुजी रुग्णालयाचे विश्वस्त प्रकाश भिडे, संजय जाखडी, डॉ. सचिन देवरे आणि हृदयशल्यचिकित्सक डॉ. किरण कुरकुरे यांची विशेष उपस्थिती होती.