इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाते. अर्थात ते काम एवढे सहज होत नाही. मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना सरकारी कार्यालयाच्या खेटा खाल्याशिवाय ही नोकरी मिळत नाही. पण आता अनुकंपा तत्वावरील नोकरीबाबत एक महत्त्वाचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
काही वर्षांपूर्वी एका घटस्फोटित महिलेने वडिलांच्या जागेवर अनुकंपा नोकरी मिळावी म्हणून रेल्वेकडे अर्ज केला. पण घटस्फोटित असल्यामुळे नोकरी देता येणार नाही, असे रेल्वेने सांगितले. पण एका केंद्रीय मंत्र्याने रेल्वेला सरकारी नियमाची आठवण करून दिली. या नियमानुसार, मुलगा, मुलगी, विवाहित मुलगी, घटस्फोटित मुलगी यांचा अनुकंपा तत्वावर नोकरीचा अधिकार आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. न्यायालयाने विवाहित मुलीला नोकरीचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) मध्ये काम करणाऱ्या राजू उसरे यांचा २०२० साली मृत्यू झाला. त्यांना पत्नी आणि दोन विवाहित मुली आहेत. आई आणि मोठय़ा बहिणीकडून सहमती घेऊन लहान मुलगी खुशबू चौतेल यांनी अनुकंपा आधारावर नोकरीसाठी अर्ज केला. परंतु, ऑगस्ट २०२१ मध्ये वेकोलिद्वारा अर्ज नाकारण्यात आला. नॅशनल कोल वेज अॅग्रिमेंटमध्ये विवाहित मुलीला अनुकंपा आधारावर नोकरी देण्याची तरतूद नसल्याचे कारण वेकोलितर्फे देण्यात आले. न्यायालयाने खुशबू यांना दिलासा देत वेकोलिला एक महिन्यात यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले.
लग्न झाले असले तरीही
मुलीचे लग्न झाले तरी तिचा वडिलांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर मिळणाऱ्या नोकरीवर पूर्ण अधिकार आहे. विवाहित मुलीला अनुकंपा आधारित नोकरी नाकारणे असंवैधानिक आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.
This is an important verdict given by the High Court regarding compassionate employment