नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी केल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहे. सकाळपासून लासलगावसह जिल्ह्यातील विविध भागात कांदा लिलाव ठप्प झाले आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले, चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर एक तासा पेक्षा जास्त वेळ रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांवा सौम्य लाठीचार्ज केला.
चांदवडला माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी आंदोलनात सामील झाले होते. आंदोलन संपल्यावर नेते व स्थानिक आंदोलक शेतकरी निघून गेले. मात्र कांदा विक्रीसाठी बाहेरगावाहून आलेल्या तरुण शेतकऱ्यांनी मात्र पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत असताना पुन्हा वाहने अडवण्याचा प्रयत्न करू लागले. या तरुणांना पोलिसांनी समजून सांगण्याचा प्रयत्न करूनही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करत आंदोलकांना रस्त्यावरून पिटाळले आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. या रास्ता रोको वाहनांच्या मोठया रांगा लागल्या होत्या
हे आहे कारण
कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला होता. ३१ डिसेंबर पर्यंत एमइपी ८०० डॉलर प्रति टन ठेवण्यात आले होते. मात्र ८ डिसेंबर २०२३ रोजी पुन्हा वाणिज्य विभागाने नोटिफिकेशन काढून कांद्यावर निर्यात बंदी लादली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी राहणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे.
आज भाव घसरले
केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदीची अधिसूचना काढल्यामुळे आज सकाळी सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात १५०० ते २००० रुपयांची घसरण झाल्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार निषेध केला आहे