इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावरुन महायुतीत मतभेद निर्माण झाले आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिक यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी थेट अजित पवार यांना पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरणर दिले आहे.
तटकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आमदार नबाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आमची भेट झाली. आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणे स्वाभाविक आहे.
नेमकं घडलं काय
मलिक गुरुवारी हिवाळी अधिवेशना आले. त्यानंतर ते सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदारांच्या जवळ बसले. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. मलिक यांच्यावर याअगोदर भाजपने गंभीर आरोप केल्यामुळे ही टीका भाजपलाही चांगलीच झोंबली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठवून सविस्तर भूमिका मांडली आहे. या पत्रात फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास विरोध दर्शवला आहे.