इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – कोरोनामुळे मनुष्य जातीच्या शरीरावर, मनावर उमटलेली वळं अद्याप गेलेली नाहीत. मृत्यूचे थैमान संपूर्ण जगाने बघितले. जागतिक आरोग्य संघटनेने अद्यापही कोरोना पूर्णपणे संपुष्टात आल्याचे जाहीर केलेले नाही. अनेक देशांमध्ये त्याचे वेगवेगळे व्हेरियंट प्रवास करीत आहेत. अशात आणखी एका आजाराच्या साथीचे संकेत देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोरोनापेक्षाही भयंकर अशा या साथीची एन्ट्री झालेली असल्याचा दावाही करण्यात आला आहे. या विषाणूला ‘एक्स’ असे नाव देण्यात आले आहे.
एक्स आजार विषाणू, जिवाणू अथवा एखाद्या अतिसंसर्गजन्य बुरशीद्वारे पसरू शकतो, असे म्हटले गेले आहे. हा आजारही प्राण्यांमधून मानवात पसरणाऱ्या प्रकारातील असेल, अशी शक्यता आहे. त्याचा मृत्युदर अधिक असेल आणि त्याच्यावर कोणतेही उपचार नसतील. हा आजार स्पॅनिश फ्ल्यूच्या साथीएवढा घातक असेल. एक्स हा गोवरइतका संसर्गजन्य, पण त्याचा मृत्युदर इबोलासारखा असण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वाढते शहरीकरण, शेतीखालील वाढते क्षेत्र यामुळे जंगलांचे प्रमाण कमी होत आहे. आधुनिक शेतीच्या पद्धतींचाही दुष्परिणाम होत आहे. त्यामुळे प्राणी आणि पक्ष्यांचे अधिवासही नष्ट होत आहेत. त्यातून जंगलातील पक्षी आणि प्राण्यांचा मानवाशी संपर्क वाढत आहे. त्यातून मानवात नवीन आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत आहे. एक्स हा आजार आजवर न सापडलेल्या अशा कारकाशी म्हणजे पॅथोजनशी (विषाणू/ जिवाणू/ बुरशी यापैकी) निगडित असून, त्याचा मोठ्या प्रमाणात मानवाला संसर्ग होऊ शकतो. करोना विषाणूपेक्षा या ‘एक्स’चा कारक घटक २० पट अधिक घातक असेल, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्याचा संसर्ग सुरू झाला असेल, असा अंदाजही वर्तविला जात आहे.
लशीचे काय?
या ‘अज्ञात’ आजारावर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. प्रत्येक घातक विषाणू प्रकाराच्या जातकुळीसाठी वेगवेगळ्या लशींचे नमुने तयार करून ठेवायला हवेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे एक्सवर आतापासूनच लस तयार करण्याची पावले उचलायला हवीत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत केवळ २५ विषाणू कुटुंबे ओळखण्यात यश मिळविले आहे. त्यातून हजारो विषाणूंची माहिती मिळाली असली, तरी अद्याप कोट्यवधी विषाणूंची माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आणखी संशोधनावर भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.