नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक आणि क्रीडा उपसंचालक नाशिक विभाग यांच्या वतीने नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलच्या मैदानावर दिनांक ३ डिसेम्बरपासून सुरू असलेल्या १७ वर्षे गटाच्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेच्या आजच्या अंतिम दिवशी खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्या संघानी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून या स्पर्धेचे विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट आपल्या नांवे केला. तर गुजराथला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने गुजराथचा १३-१२ अश्या एक गुणांनी आणि मिनिटे राखून पराभव केला. तर मुलीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करून गुजराथ संघाला १३-०६ असे सात गुण आणि एक डाव राखून पराभूत करून दुहेरी मुकुट महाराष्ट्राच्या नांवे केला.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रमुख अतिथी ऑलिंपियन खेळाडू दत्तू भोकनळ, छत्रपती पुरस्कार प्राप्त नरेन्द्र छाजेड, स्कूल गेम्स फेडरेशन चे खजिनदार भिष्मय व्यास, प्राचार्य पी. व्ही रसाळ, प्राचार्य सचिन माळी यांच्या हस्ते पार पडले. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक, मेडल्स आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले. याचबरोबर या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू शु षमा चौधरी आणि कृष्णा बनसोड (दोघीही महाराष्ट्र) यांना गौरवण्यात आले. तर उत्कृष्ठ आक्रमक म्हणून अजयभाई भवभोर (गुजरात) आणि आमृता पाटील (महाराष्ट्र) यांना आणि उत्कृष्ट बाचावपटू म्हणून अवनी वंश (गुजराथ) आणि भावेश म्हासदे यांनाही आकर्षक चषक देवून गौरवण्यात आले.
मुलांच्या अंतिम सामन्यात प्रथम सत्रात संरक्षण करतांना महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केवळ पाच गडी गमावले. तर आक्रमणात आकरा गडी टिपले. दुसऱ्या सत्रातही बचाव करतांना महाराष्ट्राने केवळ सात गडी गमावले तर अक्रमानामध्ये दोन गडी बाद करून पाच मिनिटे राखून हा सामना जिंकून या स्पर्धेचे अजिंक्यपद महाराष्ट्राच्या नावे केले.
या स्पर्धा नाशिकचे जिल्हाधिकारी तथा क्रीडा समितीचे अध्यक्ष जलज शर्मा, नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. सानंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टीळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, संजय ढाकणे, महेश पाटील आणि त्यांचे सहकार परिश्रम अथक परिश्रम घेतले.
अंतिम निकाल :-
मुले –
१) महाराष्ट्र – विजेता
२) गुजराथ – उपविजेता
३) केरळ – तिसरा क्रमांक
४) उत्तर प्रदेश – चवथा क्रमांक
मुली –
१) महाराष्ट्र – विजेता
२) गुजराथ – उपविजेता
३) पंजाब – तिसरा क्रमांक
४) ओरिसा – चवथा क्रमांक
सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू – मुली – शुषमा चौधरी , मुले – कृष्णा बनसोडे
उत्कृष्ठ आक्रमक खेळाडू :- मुले – अजय भाई भाव भोर (गुजराथ)आणि अमृता पाटील (महाराष्ट्र) उत्कृष्ठ बचाव पटू – अवनी वंश (गुजराथ), आणि भावेष म्हसदे (महाराष्ट्र)