नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नागपूर जिल्ह्यामध्ये २६ ते २८ नोव्हेंबर कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील विशेषत: धान पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागपूर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाचे कामकाज आटोपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
नागपूर जिल्ह्यामध्ये २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. नागपूर जिल्ह्यात मौदा, पारशिवनी, रामटेक, कामठी, सावनेर व हिंगणा या सहा तालुक्यात भात, कापूस आणि तूर या पिकांचे जवळपास ५ हजार ४८० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांसोबत आज केली.
रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्यांनी दुपारी ३ च्या सुमारास मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा या गावांच्या शिवारात भेटी दिल्या. यावेळी त्यांनी थेट शेतात जाऊन धानपिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केली. तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये ३३५ गावांमध्ये या अवकाळी पावसाचा तडाका बसला आहे. जवळपास २ हजार ८८० हेक्टरमधील ६ हजार ८८६ शेतकऱ्यांचे यामध्ये नुकसान झाले आहे. आतापर्यंत ५२ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहे. या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, विभागीय कृषि सहसंचालक राजेंद्र साबळे, विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, महसूल, पणन व अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.