इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सत्तेपेक्षा देश मोठा ही देवेंद्रभाऊंना झालेली उपरती ते पत्रात लिहीताहेत. पण मुळात अजितदादांवर ७० हजार कोटीच्या घोटाळ्यांचे आरोप करून ४८ तासाच्या आतच त्यांना सत्तेत सामावून घेणाऱ्या भाजपला देवेंद्र फडणवीस कधी पत्र लिहिणार याची आम्ही वाट पाहत आहोत असे सांगतत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारें यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते असा प्रश्न विचारतात? देवेंद्र भाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो असेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावरुन महायुतीत मतभेद निर्माण झाले आहे. नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिक यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी थेट अजित पवार यांना पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर अंधारे यांनी ही टीका केली.