येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पात येवला मतदारसंघातील २ मंडळ अधिकारी व २७ तलाठी कार्यालयास मंजुरी मिळाली आहे. यासाठी ३ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना महसुली कामांसाठी अधिक सुविधा मिळणार आहे.
येवला मतदारसंघातील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांचे कामे प्रगतीपथावर आहेत मात्र उरलेले २ मंडळ अधिकारी व २७ तलाठी कार्यालय मंजुरीसाठी मंत्री छगन भुजबळ यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पात येवला तालुक्यात एकूण २ मंडळ अधिकारी व २५ तलाठी कार्यालय मंजूर करण्यात आले असून निफाड तालुक्यातील उर्वरीत गाजरवाडी व नांदूरमध्यमेश्वर तलाठी कार्यालयास मंजुरी मिळाली आहे. यामुळे मतदारसंघातील नागरिकांना महसुली सुविधा जलद गतीने मिळण्यास अधिक मदत होणार आहे.
या कामालाही निधी
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पात येवला शासकीय विश्राम गृहासाठी ५ कोटी ८१ लाख १७ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच येवला प्रशासकीय संकुलातील बैठक कक्षाचे नुतनीकरण व फर्निचरचे काम करण्यासाठी ६२ लक्ष ८४ हजार इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.