नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील नाशिक-निफाड-येवला या चौपदरी रस्त्याचे पिंपळस ते येवला दरम्यानच्या काँक्रीटीकरण करण्यासाठी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून आशियाई विकास बँक प्रकल्पातून डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ५६० कोटी निधीची तरतूद करण्यात आहे.त्यामुळे नाशिक-निफाड-येवला रस्त्याच्या सुधारणेच्या कामाचा प्रश्न मार्गी लागला असून या रस्त्यावरील दळणवळणास अधिक गती प्राप्त होणार आहे.
२००४ साली छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नाशिक ते येवला या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले होते. या चौपदरी रस्त्यामुळे या मार्गाने वेगाने वाहतूक सुरू होऊन नागरिकांना कमीत कमी वेळेत प्रवास करणे शक्य झाले होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून सदर रस्त्यावर प्रचंड खड्डे निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात रस्ता नादुरुस्त झाल्याने अनेक अपघात होत होते. तसेच वाहतुकीस अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रस्त्याच्या नूतनीकरणासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे शासनाकडे सातत्याने प्रयत्न सुरू होता. त्यातून आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत या रस्त्याची सुधारणा करण्यास मंजुरी मिळाली होती.
या प्रकल्पासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे सातत्याने प्रयत्न सुरु होते. त्यामूळे गेल्या अर्थसंकल्पातून या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी ५६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. यामध्ये नाशिक – निफाड – येवला रस्ता १७९ ते २३५ किलोमीटर म्हणजे पिंपळस ते येवला या भागाचा समावेश आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल शासनास सादर होऊन या रस्त्याच्या सुधारणेच्या कामाला मंजुरी मिळाली असून या रस्त्यासाठी डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये ५६० कोटी निधीची तरतूद करण्यात आहे. त्यामूळे आता या रस्त्याच्या कामाला लवकरच सूरवात होणार आहे.