नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एका राष्ट्रीय दैनिकातील अलीकडील बातमीत असा दावा करण्यात आला आहे की एम्स दिल्लीला, चीनमधील न्यूमोनियाच्या प्रकरणांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीशी संबंधित सात जीवाणू प्रकरणे आढळली आहेत. हा वृत्त अहवाल चुकीची माहिती देणारा आणि दिशाभूल करणारा आहे. या सात प्रकरणांचा चीनसह जगाच्या काही भागांतून नोंदवलेल्या मुलांमधील श्वसन संसर्गाच्या अलीकडील वाढीशी कोणताही संबंध नाही असे केंद्र सरकाने स्पष्ट केले.
सहा महिन्यांच्या कालावधीत (एप्रिल ते सप्टेंबर २०२३) एम्स दिल्ली येथे सुरू असलेल्या अभ्यासा अंतर्गत ही सात प्रकरणे आढळली असून चिंतेचे कारण नाही. जानेवारी २०२३ पासून आजतागायत, आय. सी. एम. आर. च्या बहुविध श्वसन रोगकारकांवरील देखरेखी अंतर्गत एम्स दिल्लीच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागात चाचणी केलेल्या ६११ नमुन्यांमध्ये मायकोप्लाज्मा न्यूमोनिया आढळून आला नाही.
यात रिअल-टाइम पी. सी. आर. द्वारे प्रामुख्याने गंभीर तीव्र श्वसन रोगाचा(SARI ज्यामध्ये यापैकी सुमारे ९५ टक्के प्रकरणे होती) समावेश होता. मायकोप्लाज्मा न्यूमोनिया हे समुदायात पसरणाऱ्या न्यूमोनियाचे सर्वात सामान्य जीवाणूजन्य कारण आहे. अशा सर्व संसर्गांपैकी जवळजवळ १५-३० टक्के प्रकरणात हेच कारण आहे. भारताच्या कोणत्याही भागातून अशा प्रकारची वाढ नोंदवली गेलेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे आणि दररोज परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे खुलाशात म्हटले आहे.