नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) नागपूराला १० दिवस चालणा-या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून येथे सुरुवात झाली. विधानसभा कामकाजासाठी तालिका अध्यक्षांची नियुक्ती अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी सभागृहात जाहीर केली. विधानसभा तालिका अध्यक्षपदी सदस्य संजय शिरसाट, समीर कुणावार, चेतन तुपे आणि अॅड. यशोमती ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे अध्यक्ष अॅड नार्वेकर यांनी जाहीर केले.
विधान परिषदेत यांची नियुक्ती
विधानपरिषद तालिका सभापतींची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तालिका सभापतिपदी सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे, नरेंद्र दराडे यांची नावे नामनिर्देशित करण्यात आल्याची घोषणा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत केली.
विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना श्रध्दांजली
विधानपरिषदेचे माजी सदस्य आणि मागील कालावधीत दिवंगत झालेल्या सदस्यांना आज विधानपरिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव मांडला. यावेळी माजी विधानपरिषद उपाध्यक्ष, माजी मंत्री तथा विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते बबनराव दादाबा ढाकणे, माजी विधानपरिषद सदस्य किसनराव मक्काजी राठोड यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विधानसभेत दिवंगत सदस्यांना श्रध्दांजली
विधानसभेत दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील शोकप्रस्ताव मांडला.
विधानसभेचे विद्यमान सदस्य गोवर्धन मांगीलालजी शर्मा, माजी मंत्री बबनराव ढाकणे तसेच विधानसभेचे माजी सदस्य गुलाबराव वामनराव पाटील, श्रीपतराव दिनकरराव शिंदे, शेख रशीद शेख शफी, राजाराम नथू ओझरे, वसंतराव जनार्दन कार्लेकर, गोविंद रामजी शेंडे, दिगंबर नारायण विशे यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोक प्रस्ताव मंजूर केला. दिवंगत सदस्यांच्या विधानसभेतील कामकाजास अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी उजाळा दिला. यावेळी सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.