नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पाच विधेयक मांडल्यानंतर तसेच विरोधकांनी दाखल केलेला स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानंतर विधान सभेचे पहिल्या दिवसाचे कामकाज संपले आहे. दरम्यान, संत्र्यांच्या माळा गळ्यात घालून विरोधकांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जोरदार घोषणा केल्या. या अधिवेशात विरोधकांनी अगोदरच अनेक मुद्दे उपस्थितीत करणार असल्याचे सांगितले तर सत्ताधारीकडून दिशा सालियान प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी केली जात आहे.
आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या समीर कुणावर यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांची मागणी समजून घेतली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावाला फडणवीस यांनी उत्तर दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो फेटाळला. शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. या संदर्भात चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर असून शेतकऱ्यांना भरघोस मदत करण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
नार्वेकर यांनी संजय शिरसाट, मनीषा चौधरी यशोमती ठाकूर, चेतन तुपे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. सरकारच्या वतीने चार अध्यादेश सभागृहात ठेवण्यात आले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झाले होते.त्यामुळे पुढे या अधिवेशना नेमके काय घडलं हे बघणं महत्वाचे असणार आहे.