इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिशा सालियन प्रकरणात ज्या प्रकारचे पुरावे समोर येत आहेत, त्यामुळे संशयाचे धुके निर्माण झाले आहे. त्याबाबत जनतेसमोर स्पष्टीकरण येण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारतर्फे एसआयटी स्थापन झाल्यास आदित्य ठाकरे यांनी स्वतःहून एसआयटीला सामोरे जावे आणि हे संशयाचे धुके दूर करावे असे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एकीकडे विरोधकांनी विविध विषय उपस्थितीत करुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु केलेला असतांना दुसरीकडे सत्ताधारी गटाने दिशा सालियन प्रकरण उचलून धरले आहे. अभिनेता सुशांत सिंह यांची एक्स मॅनेजर दिशा सालियान हिचं मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आहे. या प्रकरणात एसआयटी चौकशीची घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर विविध नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे ही सर्व मागणी होत असतांना आदित्य ठाकरे मात्र दुबईत असल्याची माहिती समोर आली आहे.
कोण आहे दिशा सालियान
दिशा सालियान (वय २८) हिने दि. ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड येथील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली असे सांगितले जात होते. दिशा ही बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची आधीची मॅनेजर होती. दिशाच्या मृत्यूनंतर ६ दिवसांनी सुशांत सिंग राजपूत बांद्रा येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. गेल्या अधिवेशनातही भाजप आमदार अमित साटम यांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली. त्यानंतर इतर सदस्यांनी साटम यांची ही मागणी उचलून धरली. भाजपच्या महिला आमदारांनीही या प्रकरणाचं सत्य बाहेर आलेच पाहिजे, अशी मागणी केली होती.