इंडिया दर्पण ऑनलाईन
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू झाले आहे. दहा दिवसांच्या या अधिवेशन काळात जवळपास शंभर मोर्चे अधिवेशनावर धडकणार आहेत. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून जुंपण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच काल दोन्ही गटांच्या झालेल्या पत्रकार परिषदांत झाले आहे.
मराठा आरक्षण, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळे आदी विषयांवर विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी सरकार शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करते का आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काय निर्णय घेते? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अध्यादेश, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक, महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक या विधेयकासह पुरवण्या मागण्या सादर केल्या जातील. या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. सकाळीच गळ्यात संत्र्याच्या माळा घालत खोके सरकार, शेतकरी विरोधी सरकार घोषणा देत विधीमंडळाच्या पाय-यावर विरोधकांनी सरकार विरोधात आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडीती घटक पक्षाचे आमदार उपस्थितीत होते.