इंडिया दर्पण ऑनलाईन
गळ्यात संत्र्याच्या माळा घालत खोके सरकार, शेतकरी विरोधी सरकार घोषणा देत विधीमंडळाच्या पाय-यावर विरोधकांनी सरकार विरोधात आंदोलन केले. यावेळी महाविकास आघाडीती घटक पक्षाचे आमदार उपस्थितीत होते. राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे. शेतकऱ्यांची ही दुर्देवी परिस्थिती आहे. संपूर्ण राज्यातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे चटके भोगत आहे.
राज्यावरील वाढलेले कर्ज, शेतकऱ्यांची दैन्यावस्था, शेती क्षेत्राची दुरावस्था, शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव, राज्यातील पाणीटंचाई परिस्थीती, स्मारकांची स्थिती, आरक्षणाबाबतची असंवेदनशीलता, अल्पसंख्यांकाबाबत नकारात्मक दृष्टीकोन, कंत्राटी भरती व बेरोजगारीमुळे युवकांमधील वाढता रोष, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, सरकारची प्रसिध्दीची हाव, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक, अंतर्गत सत्ता स्पर्धेचे दुष्परीणाम, विदर्भातील कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट, अशा अनेक समस्या असल्याचेही यावेळी विरोधकांनी स्पष्ट केल्या.
यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह विरोधी गटाने आंदोलनात सहभाग घेतला.