इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरः विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपूर येथे सुरू होत आहे. या अधिवेशनात एकूण नऊ विधेयक मांडले जाणार आहे. दहा दिवसांच्या या अधिवेशन काळात ४८ मोर्चे धडकणार असून ७० मोर्चे परवाणीच्या प्रतिक्षेत आहेत. या मोर्चाला आता सरकार कसे सामोरे जाते हे महत्त्वाचे आहे.
बुधवारी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकत आपला रोख नक्की केला आहे. पत्रकार परिषदेत थेट विरोधकांनी सत्ताधारी गटावर टीका करत कोणकोणत्या मुद्दे उपस्थितीत करणार असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे विषय केंद्रस्थानी असणार आहे. त्याचप्रमाणे ड्रग्ज प्रकरण, आरोग्य विभागावर ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
हे विधेयक चर्चेत
या अधिवेशनात महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अध्यादेश, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक, महाराष्ट्र वेश्म मालकी सुधारणा विधेयक या विधेयकासह पुरवण्या मागण्या सादर केल्या जातील. या अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.
हे आहे प्रमुख मोर्चे
बंजारा समाज पहिल्याच दिवशी विधानभवनावर बोगस जात प्रमाणपत्रांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीसाठी मोर्चा घेऊन येत आहे. पहिल्याच दिवशी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा मोर्चा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई, बेरोजगारी आदी प्रश्नांवर नाना पाटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा १२ तारखेला मोर्चा निघणार आहे. ११ तारखेला आदिवासी व धनगर समाजाच्या मोर्चांसह १७ मोर्चे निघणार आहेत. ११ हजार पोलिसांचा फौजफाटा हिवाळी अधिवेशनासाठी लावण्यात आला आहे.