पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हडपसर येथील औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यातील मजुराने थट्टा मस्करीत एका अल्पवयीन मुलाच्या पोटात गुदद्वारातून कॉम्प्रेसरची हवा सोडली. त्यात या मुलाचा मृत्यू झाला. नगरमध्येही पूर्वी अशीच घटना घडली होती.
मोतीलाल साहू (वय १६) असे मृत मुलाचे नाव आहे. तो मूळचा मध्य प्रदेशातील आहे. तो आपला मामा शंकरदीन रामदीन साहू यांच्याकडे आला होता. हे कुटुंब पूना फ्लोअर अँड फूड्स कारखान्याच्या परिसरात राहत होते. पोलिसांनी मोतीलाल साहूच्या मृत्यू प्रकरणी त्याचा कामगार मित्र धीरजसिंग गोपालसिंग गौड याला अटक केली आहे. मोतीलाल दोन महिन्यांपूर्वी मामाकडे आला होता. तो कामाच्या शोधात होता. मोतीलाल व धीरजसिंग या दोघांची काही दिवसापूर्वी मैत्री झाली होती.
धीरजसिंग कारखान्याच्या तिसऱ्या मजल्यावर काम करत होता. तिथे मैदा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राची सफाई कॉम्प्रेसरच्या हवेच्या मदतीने केली जाते. या ठिकाणी मोतीलाल आला होता. अचानक धीरजसिंगने कॉम्प्रेसर सुरू करून थट्टा मस्करीत हवेचा पाईप थेट मोतीलालच्या गुदद्वाराला लावला. पाईपमधील जोराची हवा मोतीलालच्या पोटात गेल्यामुळे तो जागीच कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी धीरजला अटक केली.