नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने शहरातील दिव्यांग बांधवांच्या हिताच्या १२ कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यानुसार प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून शासकीय समितीने एकूण ४५१ प्रकरणांना मंजूर करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी या प्रकरणांना अर्थसहाय्य मंजुरीस मान्यता दिलेली आहे.
यामध्ये योजना क्रमांक ३, बेरोजगार दिव्यांगांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ४२७ प्रकरणात आणि योजना क्रमांक ९ मतिमंद, बहु विकलांग दिव्यांगांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत २४ प्रकरणात दरमहा रुपये तीन हजार याप्रमाणे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती मनपा समाज कल्याण विभागाचे उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
योजना क्रमांक पाच अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या दिव्यांगांना रुपये २० हजार ते ५० हजार पर्यंतचे शिष्यवृत्ती अर्थसहाय्य दिले जाते. या योजने करिता अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर असून त्यापूर्वी अर्ज करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे