जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) तालुक्यातील वडनगरी येथे सुरु झालेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा घेत दोन महिलांची मंगलपोत व एका महिलेची पर्स लांबविल्याचे समोर आले होते. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कथास्थळी संशयितरित्या फिरतांना २७ महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या महिला एकाच जिल्ह्यातील असून १३ महिला तर एकाच गावातील तसेच एकमेकांचे नातेवाईक असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आले आहे. याबाबत आज पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली.
जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरात ५ डिसेंबरपासून श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात झाली. कथेच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून कथास्थळी जाण्यासाठी सर्वच मार्गावर मोठी गर्दी उसळली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोनपोत लांबविल्या. यानंतर चोरीच्या विचाराने संशयितरित्या काही महिला फिरत असल्याचे आढळून येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल २७ महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यानंतर चौकशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अटकेतील टोळीतील १३ महिला एकमेकांच्या नातेवाईक असून त्या एकाच गावातील आहेत. तर उर्वरित महिला आजुबाजूच्या गावातील आहेत. चोरी करणारी महिलांची ही टोळी मध्य प्रदेशातील आहे. या टोळीला आज कोर्टात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, पंडीत प्रदीपजी मिश्रा यांच्या धुळे, मालेगाव येथील कार्यक्रमात देखील या टोळीने चोरी केल्याचे समोर आले आहे. ओळख परेड बाकी असल्यामुळे पोलिसांनी चोरी करणाऱ्या या टोळीतील महिलांची नावे उघड केलेली नाहीत. दरम्यान, आयजी साहेबांनी पोलिसांच्या पथकाला रिवार्ड जाहीर केला असल्याचेही एसपी एम. राजकुमार यांनी सांगितले. तसेच या पत्रकार परिषदला स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील हे देखील उपस्थित होते.