येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांना सिनेस्टाईल पद्धतीने तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. या दरोडेखोरांकडून पोलिसानी ट्रकसह दरोडा टाकण्याचे साहित्य लोखंडी कामी स्क्रू ड्रायव्हर तसेच मिरची पूड असा एकूण २० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेते पोलीस पथकाने संशयित आरोपी रामया पाण्या पवार राहणार पारधी वस्ती तेरखेडा तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, तसेच शंकर शिवाजी पवार, राहणार खामरकरवाडी तालुका वाशी, जिल्हा धाराशिव या दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.
या आरोपींची अधिक तपासणी केली असता राम्या पवार या आरोपीवर महाराष्ट्र व कर्नाटक मध्ये एकूण १७ गंभीर गुन्हे दाखल असून दुसरा आरोपी शंकर पवार याच्यावर धाराशिव जिल्ह्यात दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनाणीत आली आहे.
नेहमी उशिरा दाखल होणारे पहिलेच दाखल
एरवी आपण नेहमीच म्हणत असतो की पोलीस हे घटनास्थळी नेहमी उशिरा दाखल होतात. मात्र येवला तालुका पोलिस त्याला अपवाद ठरले असून गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना यश आला आहे. ६ डिसेंबर बुधवार रोजी येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला नांदगाव रस्त्यावर चोरी लुटमारीच्या घटना म्हणून कुप्रसिद्ध संवेदनशील भाग म्हणून मनुबाई घाटाची ओळख आहे. या भागात महिन्यापूर्वीच एक मोठा दरोडाची घटना घडली होती.
ट्रक संशयितरित्या आढळला
या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी सोहेल शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या आदेशान्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे, उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलीस कॉन्स्टेबल गंगासागर बनकर, पोलीस शिपाई गणेश बागुल सचिन बनकर आबा पिसाळ आदीचे पथक पेट्रोलिंग करत असताना या पथकाला आयशर कंपनीचा एक मालवाहू ट्रक संशयितरित्या आढळून आला.
सिनेस्टाईल पद्धतीने ट्रकला पकडले
या ट्रक चालकाला पोलीस पथकाने थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने आणखी ट्रक जोरात पळवत पोलिसांच्या पुढे घेवून गेला. त्यामुळे पोलिसांना अधिक संशय आल्याने दोन ते तीन किलोमीटर या ट्रकचा पाठलाग करून सिनेस्टाईल पद्धतीने ट्रकला पोलीस यांची गाडी आडवी लावण्यात आली. यानंतर या ट्रक मधील सात दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे हे करत आहेत.