इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपुरात आजपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार ९ विधेयकं सादर करणार आहे. यात पुरवणी मागण्या, कॅसिनो नियंत्रण, चिट फंड सुधारणा विधेयक, गोजातीय प्रजनन वि-नियमन विधेयक, जमीन धारणेच्या कमाल मर्यादेत सुधारणा करणारं शेतजमीन विधेयक, वेश्म मालकी सुधारणा विधेयकाचा समावेश आहे.
कॅसिनो, घोड्यांची शर्यत, ऑनलाइन खेळ यांच्या करपात्रतेच्या संदर्भात स्पष्टता आणण्यासाठी महाराष्ट्र जीएसटी सुधारणा विधेयक, येत्या शैक्षणिक वर्षात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी वेळापत्रक वाढवण्याकरता आणि औरंगाबाद तसंच उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नावातल्या बदलानुसार सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक सादर करण्याचं सरकारचं नियोजन आहे. याशिवाय ३ अध्यादेश, संयुक्त समितीकडे पाठवलेली ७ विधेयकं, विधान परिषदेत प्रलंबित १ आणि विधानसभेत प्रलंबित २ विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
प्रस्तावित विधेयके
(1) सन 2023 चे विधानसभा विधेयक – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (दुसरी सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग) (कॅसिनो, घोड्यांची शर्यत व ऑनलाईन खेळ यांच्या करपात्रतेच्या संबंधात स्पष्टता आणण्याकरीता.)
(2) सन 2023 चे विधान सभा विधेयक – महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग) (सन 2024-25 शैक्षणिक वर्षामध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणे इ. साठीचे वेळापत्रक वाढवण्याकरीता व औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नाव बदलाने त्यास अनुसरुन सुधारणा करण्याकरीता)
(3) सन 2023 विधान सभा विधेयक – महाराष्ट्र वेश्म मालकी (सुधारणा) विधेयक, 2023. (गृहनिर्माण विभाग) ( नियोजन प्राधिकरणाने पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर, वेश्म मालकांच्या संघटनेने किंवा पुनर्विकासाकरिता जबाबदार असलेल्या विकासकाने, अशा निवासव्यवस्थेऐवजी पर्यायी तात्पुरती निवास व्यवस्था पुरविण्यास किंवा भाडे देण्यास अधीन राहून, वेश्म रिकामा करण्यास वेश्म मालकांना बंधनकारक करण्यासाठी व अशा पुनर्विकासाच्या प्रस्तावाला नियोजन प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतर जे वेश्म मालक वेश्म रिकामे करण्यास नकार देतील अशा वेश्म मालकांना त्वरित निष्कासित करण्यासाठी नवीन कलम 6ब समाविष्ट करुन त्यात सुयोग्य सुधारणा करण्यासाठी)
(4) सन 2023 चे विधान परिषद विधेयक – आलार्ड विद्यापीठ विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग).
(5) सन 2023 चे विधानसभा विधेयक – महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर), (निरसन) विधेयक, 2023. (गृह विभाग) (महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) अधिनियम, 1976 याचे निरसन करण्यासाठी) (गृह विभाग).
(6) सन 2023 चे विधानसभा विधेयक – चिट फंड (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग) (अधिनियमाच्या कलम 70 खालील अपिलांची सुनावणी करण्यासाठी राज्य शासनाद्वारे अधिसूचित करण्यात येईल अशा अधिकाऱ्याला किंवा प्राधिकरणाला अधिकार प्रदान करण्याकरीता).
(7) सन 2023 चे विधान सभा विधेयक – महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) विधेयक, 2023 (कृषी व प.दु.म विभाग)
(8) सन 2023 चे विधान सभा विधेयक- महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) (सुधारणा) विधेयक, 2023 (महसूल विभाग)
(9) सन 2023 चे विधान सभा विधेयक – महाराष्ट्र (तृतीय पूरवणी), विनियोजन विधेयक, 2023.