इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर येथे उद्यापासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे, या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ‘रामगिरी’ या शासकीय निवासस्थानी चहापान आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, विधिमंडळ सदस्य उपस्थित होते
.या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातला. दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनी नागपूरच्या रविभवन इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यात दंगली, कायदा सुव्यवस्था, दुष्काळ, अवकाळीकडे सरकारचे होणारे दुर्लक्ष, राज्यात शांतता नसल्यानं आर्थिक गुंतवणूक कशी येणार असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
दुष्काळाकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन नकारात्मक आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत न देता स्वतः राज्य सरकार आपल्या दारी कार्यक्रमावर अमाप उधळपट्टी करत आहे. अवकाळी पावसानं चार लाख हेक्टरहून अधिक शेती बाधित झाल्यानं चालू हंगामाच्या शेती कर्जाची माफी सरकारनं जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.सार्वजनिक रुग्णालयात होणारे मृत्यू विदारक आहे. आरोग्य खात्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे. सरकारी तिजोरीतून हे सरकार स्वतःचा राजकीय प्रचार करून घेत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केला.