नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एनसीआरबीचा अहवाल हा नेहमी लोकसंख्या विचारात घेऊन वाचला पाहिजे. एकूण घडलेल्या घटना आणि क्राईम रेट यात मोठी तफावत असते. त्यामुळे आता एनसीआरबीचा अहवाल कसा वाचायचा, याचा अभ्यास विरोधकांनी केला पाहिजे आणि त्यांना त्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लावला.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, नागपुरात केवळ दहा दिवस अधिवेशन असे फलक कुणी लावले तर ज्यांनी कधी नागपुरात अधिवेशनच घेतले नाही. नागपूर अधिवेशनाचा कालावधी आला की ते कोविड वाढला, असे सांगायचे. आमची मात्र पूर्ण वेळ अधिवेशन घ्यायची आणि त्यात सकारात्मक चर्चा करण्याची तयारी आहे.
यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले प्रारंभी नाणारला विरोध केला, आता धारावीला विरोध करीत आहेत.
पण हे लक्षात घ्या, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या सर्व अटी-शर्ती या उद्धव ठाकरे सरकारने बदलल्या आहेत. त्यात कुठलाही बदल शिंदे सरकारने केलेला नाही. टीडीआरबाबत पारदर्शिता आणण्याचा निर्णय आम्ही घेतला असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी निवडणुकीवर विरोधकांनी केलेल्या आरोपाचा समाजार घेतला ते म्हणाले की, तेलंगणात काँग्रेस जिंकली की EVM चांगले !
कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकली की EVM चांगले ! पंजाबमध्ये आप जिंकले की EVM चांगले !हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुद्धा गेले. निवडणूक आयोगाने ओपन चॅलेंज दिले होते, EVM मध्ये गोंधळ होतो, हे सिद्ध करून दाखविण्यासाठी. पण एक व्यक्ती पुढे आली नाही.
इंडीया आघाडीच्या नेत्यांपुढे प्रश्न आहे की कार्यकर्त्यांचा उत्साह कसा वाढवायचा? असेही ते म्हणाले.