बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या भावा-बहिणीतील अंतर बरेच कमी झाले आहे. आता हे दोघेही महायुतीत आहेत. परळी या एकाच मतदारसंघासाठी दोघांची धडपड चालू असायची. त्यामुळे त्यांच्यात संघर्ष होता. आता या वादावर तोडगा निघाला असून आता बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा यांना तर परळी विधानसभा मतदारसंघातून पंकडा यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
राज्यात सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाला आहे. सरकारमधील तीन पक्षांत झालेल्या प्रारंभिक वाटाघाटीनुसार ज्या मतदारसंघातून संबंधित पक्षाचा उमेदवार निवडून आला, तो मतदारसंघ त्याच पक्षाकडे ठेवण्यात येणार आहे. साहजिकच धनंजय मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघ सोडावा लागणार आहे. आतापर्यंत पंकजा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शीतयुद्ध सुरू होते; परंतु आता त्यांच्यातील कटुता कमी झाली आहे. मुंडे बहिण-भावांमधला दुरावा कमी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.
असा झाला दूरावा दूर
परळीतल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुंडे बहिण-भावांमधला दुरावा मिटला. कार्यक्रमाआधी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गोपीनाथगडावर गेले. तिथे त्यांनी दर्शन घेतले. मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पवार, फडणवीस आणि शिंदे एकाच गाडीतून निघाले होते. त्या गाडीचे सारथ्य धनंजय करत होते; मात्र अचानक गाडी बदलण्याचा निर्णय झाला. धनंजय यांच्या गाडीतून खाली उतरून फडणवीस पंकजा यांच्या गाडीमध्ये जाऊन बसले. पंकजा आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली आणि त्यांनी एकमेकांना टाळी दिली. फडणवीसांनी मुंडे बहिण भावांना एकत्र काम करण्याची विनंती केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या विनंतीला दोघा भाऊ-बहिणीने संमती दिली.